जागतिक महासत्ता, सर्वात मोठी लोकशाही अशी बिरुदं मिरविणारी अमेरिका, इतर देशातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आपण सतत तत्पर असल्याचा दावा करत आली आहे. तसेच जगातील सगळ्या समस्यांचे तारणहार आपणच असल्याचा दावाही अमेरिका करत असते. पण अमेरिकेतील मानवी हक्कांवर होणाऱ्या आक्रमणांची महिती जगासमोर खूप कमी प्रमाणात येते. प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ नॉम चॉमस्की यांनी अमेरिकेतील माध्यमांबद्दल मांडलेल्या मतानुसार, तिथली माध्यमं ही मोठ्या प्रमाणात सरकारी आणि भांडवलदारांच्या दावणीला बांधलेली असतात. त्याचप्रमाणं ती मोठ्या प्रमाणात वंशभेद करणारी असतात. कायद्याच्या नावाखाली विशिष्ट समाजगटाच्या मानवी हक्कांवर गदा आणण्याचा इतिहास जगाला नवीन नाही. मग भारतात त्यासाठी धर्म हे माध्यम वापरलं जातं तर वंश आणि वर्णावर आधारित भेदभाव अमेरिकेनं कितीही नाकारला तरी तिथं चालूच आहे. मग त्यातून कायद्याच्या नावाखाली होणारे अन्याय अत्याचार आलेच.
कोणत्याही देशातील प्रशासनावर तेथील स्थानिक समाजमनाचं प्रतिबिंब पडलेलंच असतं. सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी पोलीस यंत्रणा त्याला अपवाद असण्याचं कारण नाही. अमेरिकेतील पोलीस यंत्रणेच्या वंशवादी हिंसात्मक कारवायांविरुद्ध बळी पडलेल्या समाज गटानं ‘हँड्स अप, डोन्ट शूट ’ असा एल्गार करीत यापुढं कृष्णवर्णियांवर कायद्याच्या नावाखालील होणारं अतिक्रमण सहन न करण्याचा इशारा दिला आहे.
मागील आठवड्यात ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ ही चळवळ परत एकदा चर्चेत आली आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोणत्याच उमेदवाराला पाठिंबा न देण्याच्या निर्णयामुळे जगाचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. अमेरिकेतील अफ्रिकन – अमेरिकन लोकांसाठी काम करणाऱ्या या चळवळीचा प्रभाव अमेरिकेतील बहुसंख्य कृष्णवर्णिय नागरिकांवर आहे. सध्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा कृष्णवर्णीय असताना ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ च्या निर्णयानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. आता लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन हक्कांवरची गदा टाळायची की प्रक्रियेच्या बाहेर राहून यावर चर्चा होवू शकते. पण तो काही आजच्या लिखाणाचा विषय नाही.
अमेरिकन पोलिसांनी गुन्ह्यांच्या तपासासाठी ताब्यात घेतलेल्या अनेक अमेरिकन - अफ्रिकन नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गुन्ह्याचा तपासाची चौकशी न करता किंवा चौकशी करून न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करत शिक्षा देण्याऐवजी ही प्रक्रिया टाळून त्यांना थेट मारण्यात येत असल्याची शक्यता त्यातून बळावली.
ट्रेवियन मार्टिन या अमेरिकन – अफ्रिकन नागरिकाची पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या केसमधील पोलीस कर्मचारी जॉर्ज झिमरमन याची न्यायालयानं जुलै २०१३ मध्ये निर्दोष सुटका केल्यानंतर ब्लॅक लाईव्हज् मॅटर नावाचा हॅशटॅश ट्विटरवर फिरू लागला आणि त्यातून या चळवळीचा उदय झाला. कोणत्याही गुन्ह्यांमध्ये अमेरिकेन – अफ्रिकन लोकांना पकडायचं आणि त्यांना पुरावं नसताना चौकशीच्या नावाखाली अटक करायची आणि त्यांची हत्या करायची, हा एक नवीन प्रकार उदयाला येत असताना त्याला विरोध करण्यासाठी हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमच्या मृत्यूनेही फरक पडतो हे सांगण्याचा प्रयत्न त्यातून सुरू झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आणखी तीन कृष्णवर्णिय नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूमुळे चळवळीनं जोर धरला आणि अमेरिकेतील बहुसंख्य अमेरिकन – अफ्रिकन नागरिक त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अवलंबिलेल्या क्रूर कटाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर उतरले. अमेरिकेत राहणाऱ्या कृष्णवर्णियांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यानं सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडं वेधलं गेलं. सुरुवातील ही चळवळ कोणच्याही नेतृत्वाशिवाय नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागानं चालू होती. पण आता या चळवळीला नेतृत्वही लाभलं आहे. अलिसिया गार्नेर , पॅर्टीस क्युरल्स आणि ओपल टोमट्टी या कार्यकर्त्यांनी चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. आज पर्यंत पोलिसांच्या कृष्णवर्णियांविरुद्धच्या द्वेषातून झालेल्या २७ हत्यांच्या केसेसमध्ये न्याय मिळविण्यासाठी ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ संघर्ष करीत आहे. मोर्चे, आंदोलनं यांच्या माध्यमातून विरोध तर चालूच आहे पण पोलिसांच्या या मानसिकतेची सैद्धांतिक मांडणी करण्याचा प्रयत्नही चालू आहे. त्यांचा हा संघर्ष आता फक्त चळवळ राहिला नसून अमेरिकेतील कृष्णवर्णियांचा बुलंद आवाज बनला आहे. तर स्थानिक यंत्रणेवर दबाव निर्माण करणारा वैचारिक गट म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अमेरिकेतील राजकारण ढवळून निघालं आहे.
तर स्थानिक गौरवर्णिय अमेरिकन लोकांच्या मते, ही चळवळ म्हणजे कृष्णवर्णियांची मक्तेदारी आहे. मागील महिन्यात कामावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची अज्ञातांनी हत्या केली. १२ एप्रिल २०१५ ला अटक करण्यात आलेल्या फ्रेडी ग्रे याच्या निधनानंतर ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’नी केलेल्या ‘बाल्टीमोर प्रोटेस्ट’नं पोलिसांनी कायदेशीर केलेल्या हत्यांचं सत्रच जगासमोर आलं. त्यातूनच संतापलेल्या कृष्णवर्णियांनी कामावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. त्यानंतर ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळ हिंसक बनल्याची चर्चाही सुरू झाली. संशयाची सुई त्यांच्याकडंच फिरवण्यात आली. तसंच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यास गौरवर्णिय घाबरले नाहीत. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ला विरोध करण्यासाठी स्थानिक गैरवर्णियांनी ‘ब्लू लाईव्हज् मॅटर’ ही चळवळ सुरु केली आहे.
विशिष्ट समूहगटाला अशा प्रकारं गुन्हेगारीकरणाचा ठप्पा लावून त्रास देण्याच्या परंपरेची फक्त अमेरिकाच पाईक नाही. जगातील प्रत्येक राष्ट्रात असे वातावरण आहे. भारतही यात मागं नाही. महाराष्ट्रामध्ये पारधी समुदायाला लावलेला गुन्हेगारीचा शिक्का त्यातीलच एक आहे. बॉम्ब स्फोटांनंतर सक्षम पुरावे नसताना फक्त मुस्लिम तरूणांची करण्यात येणारी अटक ही समांतर उदाहरणं आहेत. त्याविरुद्ध भारतातही संघर्ष चालू आहेच. दलित तरुणांना नक्षलवादी म्हणून गुंतविण्याचं आणि त्यातून त्यांच्या हत्या किंवा करण्यात येणारं शोषण हे अमेरिकेन पोलिसांच्या कृत्यापेक्षा कमी नसावं. या सर्व गोष्टींना सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणा जबाबदार असतात कारण, ज्या सामाजिक, अर्थिक व धार्मिक गटसमुहातून ते येतात त्याचा प्रभाव व्यवस्थेत काम करताना ते बाजूला ठेवू शकत नाहीत किंबहुना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात नाही.
पोलिसांनी अमेरिकन – अफ्रिकन नागरिकांविरुद्ध पुकारलेल्या बेकायदेशीर चौकशी पद्धतींविरुद्ध १५ ऑगस्ट २०१५ ला 'ब्लॅक लाईव्हज् मॅटर'नं संपूर्ण जगात १००७ ठिकाणी निर्दशनं केली. अमेरिकेला कृष्णवर्णियांनी उभारलेले लढे काही नवीन नाहीत. अमेरिकेच्या लोकशाही महासत्तेचा डोलारा हा कृष्णवर्णियांच्या शोषणाच्या स्तंभांवरच उभारलेला आहे. त्याला मोठ्या इतिहासाची जोड आहे. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’नं परत एकदा इतिहासातील जखमांचा तो संघर्ष करावाच लागणार असल्याचा निर्धार केला आहे. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आता फक्त अमेरिकन पोलिसांविरुद्धचा लढा राहिलेला नाही तर नागरी हक्कांच्या जतनासाठी चालू झालेला ऐतिहासिक संघर्ष आहे.
२७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित
लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://awhanabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
मानवी हक्काबाबतची दुतोंडी अमेरिकन नीति खूप अभ्यासपूर्ण मांडलीत ✌✌
ReplyDeleteमानवी हक्काबाबतची दुतोंडी अमेरिकन नीति खूप अभ्यासपूर्ण मांडलीत ✌✌
ReplyDeleteमहासत्तेच्या डोलाऱ्याची दुसरी बाजू समर्पक शब्दांत मांडली .......
ReplyDelete