एखाद्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मुल्यमापन करायचं असल्यास त्या देशात कलेच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या विचारांना मिळणारी स्वायत्तता हे एक महत्त्वाचं एकक ठरू शकते. जेव्हा विचारसरणीचा उतरणीचा काळ चालू असतो, तेव्हा त्या विचारसरणीवर आधारित कला त्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम करत असते. सर्वांत महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा शासनसंस्थेला ती विचारसरणी दडपायची असते तेव्हा शासनसंस्थेचा पहिला वार हा त्या विचारसरणीच्या कलेवरच असतो. त्यात मग प्रतिगामी प्रवृत्तीही काही मागे नसतात. भारतात आणि जगातही राज्यसंस्थेनं समता, न्याय आणि धर्मनिरपेक्षतावादी विचार मांडणारी कला सातत्यानं दडपण्याचा प्रयत्न केला आहे. पण समता, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि शोषणाविरूद्ध बंड करायला शिकवणारी ती कला आजही नवीन पिढ्यांना लढण्याची ऊर्जा देत आहे.
जागतिक चळवळींच्या इतिहासात क्रांतीकारी, विद्रोही आणि शोषणाविरुद्धची गाणी सातत्यानं मोठ्या प्रमाणात गायली जातात. अशी गाणी समाजात घेऊन जाणारे मानवी समूहच एक चळवळ बनलेले असतात. असाच एक तरुणांचा समूह आपल्या शेजारच्या देशात काम करत आहे. त्यांचं काम विचारांची एक सांस्कृतिक चळवळच बनलं आहे. या चळवळीचं नाव आहे ‘लाल बँड’.
पाकिस्तान, सामान्य भारतीयांच्या नजरेतून या नावाबद्दल काय प्रतिमा आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही. जेव्हा राज्यसंस्था ही धर्माधारित मूल्यांवर चालविली जाते व तिला भांडवली व्यवस्थेची जोड मिळते तेव्हा तिथली सामाजिक, राजकीय, न्याय आणि समानतेची तत्वे ही पायदळी तुडविली जातात. मूलतत्ववाद्यांची खचाखच भरणा असलेल्या, हिंसेच्या खाईत फेकला गेलेल्या आणि सामाजिक, अर्थिक आणि राजकीय परिस्थितीची चिकित्सा करायला गेल्यास जिवंत राहू की नाही अशी परिस्थिती असणाऱ्या देशात लाल बँड गाण्याच्या माध्यमातून मानवतेची मुल्य पेरण्याचं काम करत आहे.
जगातील तरुणाईला सर्वाधिक आकर्षित करणारा क्रांतीकारक ‘चे – गव्हेरा’चा फोटो असलेले टी – शर्ट अंगावर परिधान करून, कम्युनिस्ट विचारांनी प्रेरित होऊन एक तरुणी आणि तीन तरुण यांनी २००७ साली लाहोरमध्ये लाल बँडची स्थापना केली. तैमूर रहेमान, माहवश वकार, हैदर रहेमान आणि शाहराम अजहर या चौघांनी लाल बँडच्या माध्यमातून संघर्षाची मुल्य पाकिस्तानच्या तरूणाईमध्ये पेरण्याच्या कामाला सुरूवात केली होती. एक नवीन ऊर्जा, शांततेच्या मार्गानं विरोधाची प्रक्रिया इथल्या तरूणांमध्ये विकसित करण्याचं काम हे तरुण करत आहेत.
प्रसिद्ध पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज आणि हबीब जलीब यांच्या क्रांतीकारी कविता संगीतबद्ध करून त्या पाकिस्तानी आणि जगातील युवकासमोर नेण्यास लाल बँडने सुरूवात केली. विवेकवादी, समातानिष्ठ विचारांवर विश्वास असणाऱ्या पाकिस्तानी तरुण - तरुणीनीं या गाण्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. सातत्यानं अस्थिर असणाऱ्या पाकिस्तानमधील नागरिकांना राजकीय विरोधासाठी गाण्यांचा वापर करणं काही नवीन नव्हतं. पण त्याचा परिणाम मर्यादित स्वरूपात असायचा. लाल बँडच्या गाण्यांनी राज्यसंस्थेवर दडपण निर्माण केलं, आणि त्याचाच परिणाम म्हणून ६ जून २०१४ ला पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीनं लाल बँडचं फेसबुक पेज ब्लॉक केलं. पाकिस्तान सरकारची ही पूर्ण कृती जगातील संपूर्ण कलाविश्वाला हादरा देणारी ठरली. लाल बँडच्या समर्थनात जगातील विवेवनिष्ठ लोक एकवटले आणि पाकिस्ताननं चालविलेल्या या वैचारिक मुस्कटदाबी विरोधात एल्गार दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवरून तयार झालेल्या या दबाबनंतर ही बंदी मागे घेण्यात आली पण कलेवर होणाऱ्या राज्यसंस्थेच्या हुकुमशाहीचा एक धडा या प्रकरणानं इतिहासात समाविष्ट केला.
फैज अहमद फैज हे पाकिस्तानातील कम्युनिस्ट विचारांनी झपाटलेले कवी होते. १९६२ मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. तर दुसरीकडं या क्रांतीकारी कवीला चार वेळा साहित्यातील नोबेलसाठी नामांकनही मिळालं होतं. हबीब जलीब हे उर्दूतील क्रांतीकारी कवी. आता या शोषण, धर्मांधतेविरुद्ध भाष्य करणाऱ्या दोन जागतिक कवींची गाणी तरुणाईपर्यंत पोहचविणाऱ्या लाल बँडवर सरकारची बंधनं येणं अपेक्षितच होतं. कारण ही गाणी तिथल्या तरुणांना त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव निर्माण करणारी होती. अन्यायाविरूद्ध निर्माण होणारी जाणीव ही कधीच धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांना रुचणारी नसते. कारण ही जाणीव त्यांच्या राजकीय आणि धार्मिक मक्तेदारीची बुरूजं उडविणारी असते.
उम्मीद – ए – शहर (२००९) आणि उठो मेरी दुनिया (२०१३) असे दोन लाल बँडच्या गाण्यांचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. उम्मीद – ए – शहर मधील हबीब जलीब यांच्या ‘दस्तूर’ आणि उठो मेरी दुनियामधील ‘झूठ का ऊंचा सर’ तसेच ‘इन्कलाब’, या गाण्यांना अक्षरश: जगातील तरुणाईनं डोक्यावर घेतलं आहे. गाणी, फेसबुक आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून लाल बँड पाकिस्तानमधील धर्माधारित शोषण, भांडवली शोषण, दहशतवाद, राज्यसंस्थेकडून होणारी मानवी मुल्यांची मुस्कटदाबी याच्याविरूद्ध आवाज उठवत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची मुल्यं जपण्याचा प्रयत्न करत आहे. लाल बँड आज जगातील एक वैचारिक प्रवाह म्हणून वाहत आहे.
पाकिस्तानमध्ये हे सगळं घडणं साहजिकच आहे. कारण तिथली राज्यसंस्थाच पूर्णपणे धर्मावर आधारित आहे. पण कलेच्या स्वायत्ततेबद्दलची भारतातील परिस्थिती काही वेगळी आहे, असं मानण्याचं कारण नाही. राज्यसंस्था आणि धार्मिक ‘नॉन – स्टेट अँक्टर्स‘ हे सातत्यानं कलेच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या विचारांची आणि चिकित्सक मांडणीची मुस्कटदाबी करायला आजही तयारच आहेत किंवा आज त्यांचे प्रमाण वाढलेच आहे. लाल बँडच्या फेसबुकवर जेव्हा बंदी आणली गेली तेव्हा भारतातील काही गटसमूहांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा भलताच पुळका आला होता. पण हेच लोक चित्रपटांवर बंदी आणण्यासाठी जाळपोळ करण्यात पुढे असतात. शीतल साठेच्या मुंबईतील झेवियर्स महाविद्यालयामधील कार्यक्रमाला विरोध करणारे, दाभोळकरांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी आनंद पटवर्धनांचा ‘जयभीम कॉम्रेड’ हा माहितीपट दाखविला म्हणून पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्याना मारहाण करणारेही हेच असतात. ही झाली फक्त महाराष्ट्रातील उदाहरणे. देशातील अशा अनेक घटना काढल्या तर त्याची यादी संपणारच नाही त्यामुळे मुस्लिमद्वेषापोटी अभिव्यक्तीचा पुळका असणाऱ्यांनी भारतातील मुस्कटदाबीवर सोयीस्कर मौन बाळगले आहे.
क्रांतिकारी विचारांनी झपाटलेल्या आणि कलेच्या माध्यमातून शांततेच्या मार्गानं बदल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाल बँडचं कार्य आणि सांस्कृतिक चळवळ पाकिस्तानमधील तरुणाईसाठी लढण्याची प्रेरणा वृद्धिंगत केल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानमध्ये ‘अमन का राज’ आणण्यासाठी लाल बँडचं योगदान सातत्यानं राहिलच.
२० सप्टेंबर २०१५ रोजी प्रकाशित
लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://awhanabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
अभिव्यक्ती स्वातंत्र्यााचा विजय असो...
ReplyDeleteअभिव्यक्ती स्वातंत्र्यााचा विजय असो...
ReplyDelete