धर्म ही कल्पना सातत्यानं वैज्ञानिकतेच्या मार्गात अडथळा निर्माण करत असते, ही बाब सातत्यानं मी माझ्या त्या त्या संदर्भातील लिखाणात मांडत आलो आहे. एवढंच नव्हे तर धर्माच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या संकल्पना, चालीरिती, परंपरा या अभिव्यक्तीवर गदा आणणाऱ्या असतात. मग त्या राजकीय, सामाजिक व अर्थिक स्वातंत्र्यावर तर गदा आणतच असतात त्याचसोबत तुमच्या आरोग्य राखण्यावरही त्यांचा परिणाम होत असतो. मानवाचं त्याच्या शरीरसंबंधीचं निर्णय घेण्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्याला मिळणं गरजेचं असतं. पुरूषांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य अबाधित आहेच म्हणा पण महिलांचं काय ?
प्रजोत्पादनासंबंधीचं स्वातंत्र्य हा त्यातला त्यात अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मानवी समूहामध्ये प्रजोत्पादनाची अधिक प्रमाणात जबाबदारी नैसर्गिकरित्या स्त्रीच्या शरीराकडं देण्यात आली आहे. ही झाली नैसर्गिक बाब पण त्यासंबंधीच्या सामाजिक, राजकिय आणि धार्मिक स्वातंत्र्याचं काय ? ते तिला उपभोगण्याचं स्वातंत्र्य आहे का ? म्हणजे गर्भधारणा होऊ द्यायची की नाही ? झाली तर गर्भ राखायचा की नाही ? किंवा जन्म द्यायचा की नाही ? महिलेच्या आरोग्यावर गर्भधारणेचा विपरित परिणाम होत असल्यास गर्भपात करण्याचं स्वातंत्र्य तिला असल्याचं आज तरी आपल्याला दिसत नाही. ही परिस्थिती फक्त भारतात नाही तर जगातही मोठ्या प्रमाणात सारखीच आहे. महासत्ता असलेल्या आणि महासत्तेकडं वाटचाल करणाऱ्या तसंच विकसनशील देशांमध्येही परिस्थिती वेगळी असण्याचं कारण नाही. हे स्वातंत्र्य स्रीला मिळावं म्हणून प्रयत्नही चालू नाहीत असंही नाही. अशाच अनेक प्रयत्नांमधील एक नाव म्हणजे अमेरिकेतील ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ ही संस्था.
‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ जरी एक संस्था असली तरी स्त्रियांच्या प्रजोत्पादनासंबंधी स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी चाललेला त्यांचा अविरत संघर्ष हा माझ्यासाठी कोणत्याही चळवळीपेक्षा कमी नाही. ती स्त्रियांसाठीच्या आरोग्य स्वातंत्र्य आणि हक्कासंबंधीची एक चळवळच बनली आहे.
१९१६ मध्ये मार्गरेट सँजर नावाच्या महिलेनं तिच्या दोन बहिणींना सोबत घेऊन अमेरिकेतील पहिलं कुटूंब नियोजन केंद्र सुरु केलं. पण धार्मिक आणि राजकीय कट्टरवाद्यांना त्यांचा हा प्रयोग काही पटला नाही आणि त्यांनी तिघींनाही थेट कोर्टात खेचलं. त्यांच्यावर लैंगिकदृष्ट्या अश्लील, बीभत्स साहित्य विकत असल्याचा आरोप ठेवण्यात आला. ही केस ‘ब्रॉऊन्सव्हिली ट्रायल’ म्हणून जगाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. न्यायालयाचा निकाल मार्गरेट सँजर यांच्या बाजूनं लागला खरा पण, कुटूंब नियोजन प्रक्रिया महिलांच्या प्रजोत्पादन स्वातंत्र्यासंबंधी किती महत्त्वाची आहे आणि ती जगासमोर मांडणं हे मोठं आव्हान असल्याची जाणीव मात्र त्यांना झाली. त्यातूनच उदय झाला ‘अमेरिकन बर्थ कंट्रोल लीगचा.’ १९५० च्या दरम्यान याच लीगचं नाव बदलून ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ करण्यात आलं.
गर्भधारणा होवू द्यायची की नाही हा स्रिचा वैयक्तिक प्रश्न असून त्यासंबंधीचं स्वातंत्र्य तिला मिळायला हवं. स्त्रियांना प्रजोत्पादनासंबंधीचं स्वातंत्र्य, त्यासंबंधीच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजं प्रजननासंबंधीच्या सर्व आरोग्य सुविधा त्यांना कोणत्याही कौटुंबिक, धार्मिक आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय मिळाल्या पाहिजेत. मग त्यात सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचाही समावेश आलाच. हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन संस्थेची वाटचाल सुरू झाली. आरोग्य सुविधांसाठी सरकारच्या प्रयत्नांवर अवलंबून न मानता ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’नं स्वत:ची आरोग्य यंत्रणा प्रस्थापित केली आहे. आज अमेरिकेमध्ये ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ची जवळपास ८५ शाखांतर्गत ८२० आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्राच्या माध्यामातून माहिलांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. वर्षाकाठी ११ लाख महिलांवर उपचार केले जातात. ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’चे आज २७ हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत.
आरोग्य सुविधा पुरविण्याचं काम तर चालू होतं पण हा लढा फक्त आरोग्य सुविधा पुरवून संपणारा नव्हता कारण महिलांच्या आरोग्याविरोधी असणाऱ्या
सामाजिक, राजकीय आणि धार्मिक भिंती तोडण्यासाठी हा लढा राजकीय आणि कायदेशीर पातळीवर लढणं महत्त्वाचं होतं. ‘प्लान्ड् पॅरेंटहूड अँक्शन फंड’ म्हणजेच पीपीएएफही त्यांची राजकीय कृती करणारी शाखा स्थापन झाली आणि आज अमेरिकेतील प्रजोत्पादनासंबंधीच्या चर्चेत सर्वात महत्वाचा राजकीय प्रभाव टाकणारा गट म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं.
‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ च्या इतिहासात दोन साध्य झालेली ध्येय माझ्या दृष्टीनं खूप क्रांतीकारी आहेत. आज जगामध्ये मोठ्या प्रमाणात महिला गर्भधारणा टाळण्यासाठी गोळ्यांचा वापर करतात. या गोळ्यांना मान्यता प्राप्त करून देण्यासाठी जागतिक अन्न आणि औषधी प्रशासनाकडं ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’नं सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्याचं फलित म्हणूनच आज या गोळ्यांची मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
दुसरा लढा जो ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’च्या कामाला चळवळीशी जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. गर्भपात आणि त्यासाठी लागणार खर्च हा अधिक असतो. त्यामुळं गर्भपात आरोग्य उपचारावर फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी निर्माण झालेली आजही दिसतेच. मग अर्थिकरित्या दुर्बल समाजगटातील महिला शास्त्रोक्त गर्भपाताऐवजी पारंपारिक गर्भपात प्रक्रियेचा अवलंब करतात आणि अनेक वेळेला ही प्रक्रिया त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळं कुटूंब नियोजनाच्या प्रक्रियेत समानता आणण्यासाठी अर्थिकरित्या दुर्बल असणाऱ्या महिलांना सरकारनं अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’नं अमेरिकेत लढा उभारला. रिचर्ड निक्सन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या लढ्याला यश आलं आणि ‘टायटल एक्स’ नावाचा फंड निर्माण करण्यात आला.
१९१६ साली सुरू झालेला हा महिलांच्या आरोग्य हक्कांसंबधीचा लढा आजही चालू आहे. कदाचित ज्या हक्कांसाठी ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’चं काम चालू झालं होतं, त्याविरोधी कार्य करणारे गट आता अधिक संघटित, तीव्र आणि हिंसक झाले आहेत. ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’च्या आरोग्यकेंद्रांवर आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची वाढती संख्या त्याचेच संकेत देत आहेत. ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ च्या महिलांच्या गर्भधारणा स्वातंत्र्याच्या लढ्याला विरोध करण्यासाठी ‘प्रो – लाईफ’ नावाची संघटनाही कार्यरत झाली आहे. महिलांच्या हक्कांविरोधी काम करणारे कट्टरतावादी ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ आरोग्य केंद्रामध्ये कधी गोळीबार करतात तर कधी मारहाण करतात. नुकताच तीन महिन्यांपूर्वी ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ च्या केंद्रावर हल्ला करण्यात आला होता. त्यात रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. एकीकडं विज्ञानाची कास धरणारी अमेरिका अशी प्रतिमा जगासमोर असली तरी तिथही हिंसक मुलतत्ववादी कमी नाहीत. या मुलतत्ववाद्यांनी ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ ला कौटुंबिक व्यवस्थाविरोधी ठरविण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गुरूवारी सनातन सारख्या संस्थेनं श्याम मानव यांनाही कौटुंबिक व्यवस्थाविरोधी असल्याचा शिक्का मारल्याचं उदाहरण मुलतत्ववाद्यांच्या मानसिकतेशी जोडता येऊ शकतं का ? त्यामुळं जगात कुठंही महिलांच्या हक्कासंबंधी बोलण्याचा प्रयत्न केल्यास, त्या व्यक्ती संघटनांवर कौटुंबिक व्यवस्थाविरोधी असल्याचा शिक्का मारल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
हे सर्व चालू असलं तरी महिलांच्या प्रजननासंबंधीच्या आरोग्य सुविधांवर लादण्यात येणारी राजकीय आणि धार्मिक बंधनं, गर्भपातापूर्वी करण्यात येणारी अल्ट्रासाऊंड चाचणी याविरोधी आजही ‘प्लान्ड् पॅरेंटहूड’ मोठा संघर्ष करत आहे. जगात प्रजननांसंबंधीच्या आरोग्य सुविधा न भेटल्यामुळं दरवर्षी जवळपास २ लाख ८७ हजार महिला मरतात. म्हणजे प्रतिदिवस ८०० महिला मृत्यू पावतात असं जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीतून दिसून येतं. त्यामुळं महिलांच्या आरोग्याबाबतीत आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. तसंच प्रजोत्पादनासंबंधीचं स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी संघर्षही चालू आहे पण तो अजून मोठ्या प्रमाणात तीव्र करण्याची गरज आहे. भारतातही त्याची गरज मोठ्या प्रमाणात आज दिसून येते. तंत्रज्ञानानं जरी आज भारतातील महिला मॉडर्न झाल्या असल्या तरी प्रजोत्पादनासंबंधीचं स्वातंत्र्य मागण्यासाठी त्या सिद्ध आहेत का ? आज धर्माच्या नावाखाली अल्पसंख्यांक समूहांना त्रास देण्यात येत आहे, त्यात महिलाही सहभागी असतात, सहभागी नसल्या तरी मुलतत्ववाद्यांच्या अफवांना बळी पडून अल्पसंख्यांक समूहांचा द्वेष करायला लागतात. पण अल्पसंख्यांक आणि परधर्मियांनतर धर्माचं पुढचं लक्ष्य हे स्त्रियांचं स्वातंत्र्य मोडीत काढण्याचं असू शकतं. इतिहासाकडं पाहिल्यानंतर तुम्हालाही याची जाणीव होईलच.
लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://awhanabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/

No comments:
Post a Comment