भारतात किंवा इतर विकसनशील,
अविकसनशील देशांमध्ये तसं पाहिलं तर अर्थिक गोष्टींबदद्ल हवी तेवढी जागरूकता
पहायला मिळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा ना, आता पुढच्या महिन्यामध्ये भारताचा
केंद्रीय अर्थसंकल्प, रेल्वे अर्थसंकल्प जाहीर करण्यात येईल. रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय
आता तयारीलाही लागलं असेल. पण मी, तुम्ही, तुमच्या माझ्या आजू - बाजूला वावरणारा
सामान्य माणूस अर्थसंकल्पाबद्दल किती जागरूक दिसतो ? माध्यमातून अर्थसंकल्पाच्या तासान्
तास चर्चाही आता सुरू होतील. पण आमच्यासाठी अर्थसंकल्पाचं आकलन हे काय स्वस्त झालं
आणि काय महाग ? याच्यापलीकडं जात नाही.
दुसरीकडं २०११ च्यानंतर कधी नव्हे
ते काळ्या पैशासंदर्भातील चर्चा मोठ्या प्रमाणात भारतात व्हायला सुरूवात झाली. मे
२०१२ मध्ये केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयानं काळ्या पैशावरची श्वेतपत्रिकाही
काढली. त्यानंतर ठिक २ वर्षानी पार पडलेल्या म्हणजेच मे २०१४ मधील लोकसभेच्या
सार्वजनिक निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्दाभोवती काळ्या पैसाचा मुद्दाही
फिरविण्यात आला. पुढं सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष तपासणी पथकानं काळा पैसा
असणाऱ्या ६२७ जणांची यादीही तयार केली. त्यातील नावं जाहीर करावीत की नाही यावरून
बराच वादही झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा परत आणण्याचं पोकळ
आश्वासनही प्रचारसभांच्या फैरीमध्ये मांडलं. पण पुढे जागतिक दौऱ्यांच्या व्यापात
त्यांनाही काळ्या पैसा बद्दलची आश्वासनं विसरणंच सोयीचं वाटलं असेल. कारण ज्या
उथळपणं काळ्या पैसा संदर्भात चर्चा भारतीय माध्यमांमध्ये आणि राजकारण्यांमध्ये
झाली तेवढा तो विषय सोपा नाही. अतिशय क्लिष्ट असा विषय असल्यानं सामान्य माणूस
त्याकडं लक्ष देत नाही.
त्यामुळं या सगळ्या मुद्दांकडं
सामान्य माणसांनं गांभीर्यानं पाहावं, कारण काळ्या पैसाची निर्मिती ही माणसाच्या
दैनंदिन अर्थिक व्यवहारातूनच होत असते. काळ्या पैसाचा थेट परिणाम हा सरकारच्या
तिजोरीत जमा होणाऱ्या करावर पडतच असतो. तर या कर उत्पन्नाचा थेट परिणाम हा प्रशासन
आणि विकास यावर पडतो. त्यामुळं सामान्य नागरिकांनी याबद्दल जागरूक असणं अपेक्षित
आहे, त्यांनी अर्थसाक्षर होणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन पुण्यात ‘जनवित्त’ अभियानाची सुरूवात झाली.
पुण्यातील समाजविज्ञान अकादमीच्या
पुढाकारतून ही मोहीम सुरू झाली. पुण्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी, तरूण,
पत्रकार, विविध कामगार संघटना, जनसंघंटनांच्या सहभाग आणि पुढाकारतून काळ्या
पैसाविरुद्धचा हा लढा मागील दीड वर्षापासून चालू आहे. सरकारी कार्यालयं,
महाविद्यालयं, चौक, सार्वजनिक ठिकाणी जाऊन काळ्या पैशाची निर्मिती, वाढ,
त्यासंबंधीचं सरकारी धोरण, त्याचा विकास प्रक्रियेवर पडणारा परिणाम याबद्दल
जनजागृती करण्याचं काम ‘जनवित्त अभियाना’च्या माध्यमातून करण्यात
येतं.
प्रशासनानं तुम्हांला आम्हांला
सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसारखी मलाही असते. पण विकास
करायला, सुविधा पुरवायला सरकारच्या तिजोरीत जमा होणारा पैसा हा करांच्या स्वरुपात
जमा होतो. पण सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या करांची आकडेवारी ही सरकारच्या कर
गोळा करण्याच्या पद्घतीची केविलवाणी अवस्था दर्शविणारी आहे. भारतातील फक्त ३.३
टक्के लोकसंख्या कर भरत असल्याची धक्कादायक माहिती सरकारच्या अहवालांमधून समोर आली
आहे. एकीकडं आम्ही अमेरिकेत पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल बोलतो, पण अमेरिकेतील
४६ टक्के लोकसंख्या कर भरते याचा मात्र आम्ही कधीच विचार करत नाही. न्यूझीलंडमध्ये
७५ टक्के, सिंगापूरमध्ये ३५ टक्के लोकसंख्या कर भरते. म्हणजे १२१ कोटी
लोकसंख्येच्या भारतात फक्त ३.२४ टक्के लोक कर भरतात. म्हणजे देशातील खूप मोठी
लोकसंख्या अशी आहे, की जी कर बुडविते.
प्रशासनही सरकारच्या तिजोरीत पैसा
नसल्याचं कारण पुढं करत सार्वजनिक सोयी -
सुविधा पुरविण्यामध्ये चाल ढकल करण्याचा प्रयत्न करत असते, बहुतांश वेळा अडचणी
खऱ्या असतात. या सगळ्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष थेट परिणाम तुमच्या माझ्या
जगण्यावर पडत असतो. दुसरीकडं प्रशासन पैसा नसल्याचं कारण पुढं करीत सार्वजनिक
सुविधांचं खाजगीकरण करण्याचा छुपा डावही याच्यामागून खेळत असतं. नोकरदार, राजकारणी,
राजकीय पक्ष, भांडवलदार आणि काळ्या पैशाची निर्मिती यांचं एक जवळचं नातं भारतात आहेच, ते नाकारण्याचं धाडस कोणीही करणार नाही.
पण करबुडवेगीरीतून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वापर खाजगीकरणाचा डाव साधण्यातही
करण्यातही येत आहे. त्यामुळं आपण सर्वांनी काळ्या पैसा बाबत जागरूक असणं गरजेचं
आहे, तसेच अर्थसाक्षर असण्यातची मोठी गरज आज निर्माण झाली आहे. एकीकडं महागाई वाढत
आहे, तुम्हांला आम्हांला गॅसची सबसिडी सोडण्याचं भावनिक आवाहन करण्यात येत आहे,
रेल्वे प्रवासाच्या भाड्यात मोठी वाढ करण्यात येत आहे, डाळीच्या दरांनी द्विशतक
गाठलं आहे तर दुसरीकडं विजय मल्ल्या, अंबानी यासारख्या भांडवलदारांचं कोटीच्या
कोटींचं कर्ज सरकारकडून, सरकारी बॅकांकडून माफ करण्यात येत आहे. एफडीआयच्या
नावाखाली देशातून बेकायदेशीररित्या गेलेला पैसा कायदेशीररित्या परत आणण्याचे
प्रकार सरकारच्या संगनमतानं करण्यात येत आहे. याचं उदाहरण म्हणून ‘मॉरिशस’मधून भारतात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचा थेट विचार करायला हवा.
जगाच्या नकाशावर टिंबाच्या आकाराचा
हा देश, पण सरकारच्या ‘इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन’
विभागाच्या अहवालानुसार २००० ते २०१५ या काळामध्ये भारतात झालेल्या थेट परकीय
गुंतवणुकीच्या ३४.४० टक्के इतकी गुंतवणूक ही एकट्या मॉरिशसमधून झालेली आहे.
म्हणजेच २६५,२६४. ५६ मिलियन अमेरिकन डॉलर्सपैकी (१,३४०,२३१.०४ कोटी रुपये) ९१,
२२२.३६ मिलियन अमेरिकन डॉलर्स (४४९,१४७.५७ कोटी रुपये) इतकी गुंतवणूक एकट्या मॉरिशसमधून
झालेली आहे. या एकाच देशातून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून देशातून
परदेशात गेलेला बेकायदेशीर पैसा कायदेशीररित्या
परत आणण्याचं पद्धतशीर काम सरकारी आशिर्वादानं चालू आहे. हे कसं होतंय त्याचा
खोलात जाण्याचा या लेखाचा उद्देश नाही. पण काळ्या पैशाची निर्मिती आणि वाढ ही
तुमच्या आमच्या सार्वजनिक गरजांवर परिणाम करत आहे. त्यामुळं याविरुद्ध
संघटितरित्या लढा उभा करण्याचं काम जनवित्त अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत
आहे.
‘जनवित्त अभियान’ काळ्या पैसाविरुद्धची एक जनजागृती मोहीम म्हणून जरी सुरू झालेलं असलं तरी
आता ती एक अर्थसाक्षरतेची चळवळ बनली आहे. तिचं स्वरूप विस्तारत आहे. पुण्यापुरती
ती मर्यादित राहिली नाही तर औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई इत्यादी
शहरांमध्ये जनवित्त अभियानाच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तरुणांना
या प्रश्नांवर जागृत करण्याचं काम शाळा महाविद्यालयांमधून करण्यात येत आहे.
करप्रणालीमध्ये सुधारणा, काळ्या
पैशासंबंधी कडक राजकीय, कायदेशीर पाऊल उचलावं यासाठी सातत्यानं जनवित्त
अभियानाच्या माध्यमातून लढा उभारण्यात येत आहे. तसेच जे टॅक्स हैवन्स आहेत,
त्यांच्या सोबत असलेल्या ‘डबल टॅक्सेसन अव्हॉयडन्स ट्रिटी’बाबत
पुनर्विचार, बेनामी कायदा, ‘मनी लॉड्रिग’ कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यासारख्या मागण्या जनवित्त अभियानाच्या
माध्यमातून करण्यात येत आहेत.
पुढच्या महिन्यात केंद्र सरकारचा
अर्थसंकल्प जाहीर होईल. त्यानिमित्तानं जनवित्त अभियानामार्फेत काळ्या पैसाविरोधात
सरकारनं ठोस पाऊल उचलावं व इतर कर सुधारणांच्या मागण्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी
आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात अनेक कामगार संघटना, राजकीय पक्ष, जनसंघटना. युवक
संघटना, विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत. जनवित्तच्या कार्यशाळा राज्यातील
विविध जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत. यावर्षी जनवित्त अभियाना अंतर्गत लोकांच्या
सहभागातून आणि विविध क्षेत्रातील जनसंघटनांच्या प्रतिनिधींनी मिळून तयार केलेला
लोकांचा अर्थसंकल्पही मांडण्यात येणार आहे. त्याचा ड्राफ्ट अर्थ मंत्रालयाकडं
पाठविण्यात येणार असून, सरकारच्या अर्थसंकल्पाकडून नागरिक म्हणून तुमच्या माझ्या
असणाऱ्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तुम्हीही
या काळ्या पैशाच्या, अर्थसाक्षरतेच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता. कारण हा
निर्माण होणार काळा पैसा हा तुमचा माझा आहे. ‘ग्लोबल फायनान्स इंटिग्रिटी’च्या अहवालानुसार भारतातून २००३ ते २०१३ या काळात परदेशात गेलेल्या काळ्या
पैशाची रक्कम २८ लाख कोटी (४३९.५९ बिलियन अमेरिकन डॉलर्स) आहे. तुमच्या माझ्या विकासासाठी वापरण्यात येऊ शकली असती एवढी रक्कम जर
बेकायदेशीररित्या बाहेर जात असेल तर तुमच्या माझ्या आजूबाजूला न होऊ शकणाऱ्या
सार्वजनिक विकासासाठी आपणच जबाबदार असणार आहोत. त्यामुळं आता आवाज उठविण्याची वेळ
आली आहे.
संदर्भ
१. फॅक्टशीट ऑन फॉरेन डायरेक्ट
इनवेस्टमेंट, एप्रिल २००० त सप्टेंबर २०१५. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड
प्रमोशन, भारत सरकार.
२. द ब्लॅक होल. लेखक – अजित अभ्यंकर,
सिंझनी जैन
१० जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित
लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://awhanabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/