- अभिषेक भोसले
शेंगदाणा चटणी आणि सोलापूरी चादरीच्या पलीकडं सोलापूर प्रसिद्ध आहे ते विडी उत्पादनासाठी. सर्वसामान्यांच्या विडी उत्पादनासाठी. फक्त सोलापूरचा विचार केला तर आज घडीला सोलापूरात ७०००० विडी कामगार आहेत. ४० ते ५० वर्षापासून विडी बनविणारे कामगार तुम्हांला सोलापूरमध्ये भेटतील. म्हणजे लिज्जत पापडचा व्यवसाय जसा इतर शहरांमध्ये बघायला मिळतो तसं सोलापूरमधल्या बहुतांश घरांमध्ये विडी बनविताना कामगार दिसतील.
यात बहुतांश प्रमाण हे महिलांचे. घरातलं काम उरकून दररोज ८ ते १० तास या महिला विडी बनविण्याचं काम करतात.
यांना किमान वेतन मंजूर झालेलं आहे पण तेही तुटपुंजच. सुधारित किमान वेतन मिळायला हवं यासाठी अनेक वर्षापासून हे विडी कामगार लढत आहेत. बरं सध्या जे किमान वेतन आहे ते १००० विड्यांसाठी आहे. आज पानच खराब निघाली. किंवा दर्जाच कमी आहे आणि त्यातही मार्केट नाही ही वस्तुस्थिती इतर कारणं सांगून ५०० च्या जवळपासच विड्या यांच्याकडून कारखान्यावर घेतल्या जातात. म्हणजे अर्धाच माल, त्यामुळं आपोआप आहे ते किमान वेतन पण पूर्ण मिळत नाही.
२००३ मध्ये धुम्रपान विरोधी विधेयक आलं आणि या व्यवसायाला उतरती कळा लागली. सिगारेट चं ब्रॅडिंग असतं, चकाकणारं पॅकिंग असतं. सिगारेट पॉकिटच्या पूर्ण एका बाजूला धोक्याची सूचना दिला की विषय संपला. पण विडीचं तसं नाही. त्याचे कट्टे असतात. ते साध्या पद्धतीनं पॅक केलेले असतात. या सगळ्यात हा व्यवसाय आणि उत्पादन विधेयकाच्या कचाट्यात बरोबर सापडलंय.
विचार करा, आज घडीला फक्त सोलापूरात ७०००० विडी कामगार आहेत. तर २००३ मध्ये किती संख्या असेल. त्या संख्येवर अवलंबून त्यांची कुटूंबही आहेत. या एका उद्योगानं ती सगळी लोकं देशोधडीला लागत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचं कोणतंही धोरण नाही.
कारखान्यात विडी जमा करायला गेलं की, कारखानदार एक दोन जास्त कट्टे मागतात. त्याशिवाय मापच करत नाहीत. याला गुल्लाकट्टा म्हणतात. ही पद्धत रद्द करण्यासाठीही मोठा संघर्ष हे विडी कामगार करत आहेत.
हे सगळं कमी होतं की काय म्हणून सरकारनं नोटाबंदी जाहिर करून या कामगारांचं कंबरडंच मोडलं. नोटाबंदीच्या काळात कित्येक महिने या लोकांना कामाचा मोबदला मिळाला नाही. बॅंकेत खातं काढायला सांगण्यात आलं. त्यावर कित्येक महिने पैसे जमा झाले नाहीत. जेव्हा जमा झाले, तेव्हा बॅकेनं मागचे काही महिने मिनिमम बॅलन्स ठेवलं नाही म्हणून ते कापून घेतले.
एवढी मोठी विडी कामगारांची संख्या असणार्या सोलापूरात साधं त्याच्यासाठी एक रुग्णालय नाही. शहरातील विडी कामगारांची मोठी संख्या पाहता १०० खाटांच्या रुग्णालयाची मागणी हे कामगार अनेक वर्षांपासून करत आहेत.
