- अभिषेक भोसले
सोलापूर मधल्या यंत्रमाग व्यवसायामध्ये हजारो लोक आजही काम करत आहेत. त्यांची कुटूंब आजही या व्यवसायावर अवलंबून आहेत.
या महिला १० - १० तास काम करतात. १० तास काम केल्यानंतर जास्तीत २०० रुपये मिळतात. ह्या फोटोमध्ये त्या बनवत असलेल्या पेटीची किंमत १७ रूपये आहे. अशा १० ते १२ पेट्या त्या दिवसाला बनवतात. जेवढं काम तेवढाच पैसा. किमान वेतन नाही. प्रा.फंड, ग्रॅच्यएटी. इ.एस.आय. रजा, बोनस इत्यादी काहीच सुविधा मिळत नाहीत. अनेक कारखान्यांमध्ये तर पुरूष कामगारांसाठी शौचालय ही नाहीत. एकदा आत गेलात आणि यंत्र चालू केलं की कशासाठीच बाहेर पडता येत नाही.
पूर्ण काम हे वाकून आहे. त्यामुळं पाठीचं आजारपण हे आयुष्याच्या कष्टातून म्हातारपणाची भेट म्हणून मिळणारच आहे.
हे काम जिथं चालू आहे त्या जागा दोर्यांच्या कणांनी गच्च भरलेली आहे. या कामगार महिलेचं डोकं बघितलं तर लक्षात येईल. महिन्याचे ३० दिवस आणि दिवसाचे १० तास या महिला श्वासासोबत हे कणही फूफ्फूसात भरत असतात. त्यांच्यासाठी मास्क वगैरे गोष्ट तर दूरचीच.
कधीही कामाचा बोनस न मिळालेल्या या यंत्रमाग कामगारांना मात्र पाठ दुखीच्या आजारासोबत दोर्यांचे कण आयुष्यभर फूफ्फूसात साठविल्यामुळं टी.बीचा बोनस मिळणार असतोच.
५० वर्ष हेच काम करणारे कामगार तुम्हांला सोलापूर एमआयडीसीमध्ये भेटतील. अनेक जण आजारपणाने ग्रासलेलं. चेहर्यावर हातबलतेचा भाव घेऊन वावरणारे. त्यांच्यासाठी एक साधं रुग्णालय नाही. काम करताना काही अपघात झालं तर मलमपट्टीच्या पलीकडं काही मिळत नाही.
